नवी दिल्ली – पुण्यातील प्रसिद्ध आणि खासगी हिल स्टेशन असलेले लवासाची अखेकर विक्री करण्यात आली आहे. दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू केल्यानंतर सुमारे 5 वर्षांनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी)ने त्यास मान्यता दिली आहे. पुण्याच्या डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरने ते 1,814 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
दिवाळखोरी संहिता अंतर्गत दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणने ऑगस्ट 2018 मध्ये, एचसीसीची रिअल इस्टेट कंपनी लवासा कॉर्पोरेशनच्या कर्जदारांची याचिका स्वीकारली. लवासाला प्रमुख कर्ज देणा-या युनियन बॅंक ऑफ इंडिया, एल अँड टी फायनान्स, आर्सिल, बॅंक ऑफ इंडिया आणि ऍक्सिस बॅंक यांचा समावेश आहे.
डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही प्रामुख्याने पायाभूत सुविधा आणि बांधकाम कंपनी आहे. हा डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपचा एक भाग आहे आणि त्याचा पाया 2010 मध्ये घातला गेला. लवासा विकत घेणा-या डार्विन समूहाने यापूर्वी जेट एअरवेज आणि रिलायन्स कॅपिटलच्या बोली प्रक्रियेत रस दाखवला होता.
डार्विनचे प्रवर्तक अजय सिंग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, एनसीएलटीने देशातील महत्त्वाकांक्षी जागतिक दर्जाचे स्मार्ट सिटी विकसित करण्याचे आव्हानात्मक काम आमच्यावर सोपवले आहे.या निर्णयामुळे राष्ट्र निर्माणाप्रती आमची बांधीलकी बळकट होईल. लवासा आता पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.