पुणे – पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेपूर्वी बहुपर्यायी प्रश्नांचे (एमसीक्यू) संच द्यावेत, असे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला देण्यात आले आहेत. मात्र, परीक्षेसाठी महिन्यापेक्षा कमी कालावधी असताना प्रश्नसंच मिळण्यासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. प्रश्नसंच उपलब्ध होण्यास आणखी आठवभराचा कालावधी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
पुणे विद्यापीठाने ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने “एमसीक्यू‘ परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. “एमसीक्यू‘मध्ये उत्तर चुकले, की थेट शून्य गुण मिळतात, त्याचा परिणाम निकालावर होणार असल्याने सरावासाठी प्रश्नसंच उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी होत आहे.
पुणे विद्यापीठाने प्रश्नसंच तयार करण्यासाठी विद्याशाखा व अभ्यासमंडळांच्या माध्यमातून तज्ज्ञ प्राध्यापकांना हे काम दिले आहे. एका विषयाचे सुमारे 300 प्रश्न काढले जाणार आहेत. त्यापैकी 50 गुणांच्या परीक्षेमध्ये 50 प्रश्न सोडविणे अनिवार्य असतील. विद्यार्थ्यांना सुमारे 60 प्रश्न परीक्षेसाठी दिले जाणार आहेत.
दरम्यान, परीक्षेचे नियोजन, प्रश्नसंच तयार करणे, वेळापत्रकाच्या कामासाठी विद्यापीठात प्र–कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती नियुक्त केली. त्यात चार विद्याशाखांचे अधिष्ठाता व तीन ते चार प्राचार्य आहेत. ही समिती विद्यार्थ्यांना प्रश्नसंच द्यायचा की नाही, द्यायचा असेल तर तो कधी उपलब्ध होईल याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.