पिंपरी -आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी निवडणूक विभागाने (गुरुवारी) रात्री उशिरा प्रसिद्ध केली आहे. 84 हजार मतदारांच्या प्रभागात बदल करण्यात आला आहे. त्याची टक्केवारी 5.50 टक्के आहे. याबाबतची माहिती निवडणूक विभागप्रमुख बाळासाहेब खांडेकर यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक शाखेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 23 जून रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार एकूण 15 लाख 693 मतदार होते. त्यापैकी 12 हजार 564 वगळलेले म्हणजे स्थालांतरित किंवा मयत झालेले मतदार आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीला 14 लाख 88 हजार 129 मतदारांची संख्या आहे. त्यात पुरुष 8 लाख 394, महिला 6 लाख 87 हजार 647 आणि इतर 88
मतदार आहेत.
प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींच्या अनुषंगाने सुमारे 84 हजार मतदारांच्या प्रभागांमध्ये बदल करण्यात आला आहे. मतदार यादीवर तब्बल 8 हजार 700 हरकती आल्या होत्या. हरकतींचा निपटारा करुन 9 जुलै रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करायची होती. मात्र, अतिवृष्टी आणि हरकती जास्त असल्याने अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यासाठी 16 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पुन्हा राज्य निवडणूक आयोगाने 21 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली. आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, नगर रचना सहसंचालक प्रशांत शिंपी, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड तसेच 160 प्रगणक, 70 पर्यवेक्षक, 35 नियंत्रित अधिकारी, 450 बीएलओ या कामकाजासाठी महिनाभर काम करत होते. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थळ पाहणी, पंचनामे पूर्ण करून अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महिनाभरापासून अंतिम मतदार यादीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. तर सार्वत्रिक निवडणुकीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. अंतिम याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ओबीसी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. पुढील दोन आठवड्यात ही सोडत काढल्यानंतर निवडणूक आयोगाकडून कोणत्याही दिवशी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्यामुळे राजकीय वातावरण गरम होण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे. पावसाळ्याचे केवळ दोनच महिने शिल्लक राहिल्यामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा आक्टोबर महिन्यात निवडणूक होणार असल्याने राजकीय पटलावर वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.