नांदेड – काही दिवसांपूर्वीच अभिनेता अक्षय कुमार याचा एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटात मोठ्या रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांची कशाप्रकारे लूट केली जाते. हे दाखविण्यात आलं होते. तसेच काही दवाखान्यात रुग्ण दगावल्यानंतरही पैसे उकळण्यासाठी त्याच्यावर खोटेनाटे उपचार केले जातात, हे दाखवलं होते. अगदी तसाच किस्सा नांदेड येथून समोर आला आहे. येथील एका रुग्णालयात डॉक्टरांनी मृत्यूनंतर तीन दिवस करोना रुग्णावर उपचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नांदेड शहरातील गोदावरी या खाजगी रुग्णालयानं करोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे उकळण्यासाठी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही 3 दिवस उपचार केल्याचा आरोप आहे. संबंधित रुग्णालयानं करोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर विविध औषध आणि उपचाराच्या नावाखाली पीडित नातेवाईकांचे लाखो रुपये उकळले. कहर म्हणजे उपचाराचा तपशील मागितल्यानंतर आणखी ४० हजार रुपयांची मागणी केल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले.
मृताच्या पत्नीनं याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने संबंधित रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अखेरीस शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटल तसंच येथील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करोनावर उपचार घेण्यासाठी अंकलेश पवार यांना १६ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाने २४ एप्रिल रोजी जाहीर केले. मात्र २१ ते २४ एप्रिल या कालावधीत रुग्णालयाने सुमारे दीड लाख रुपये रुग्णाच्या नातेवाईकांकडून घेतले. तसेच उपचाराच्या नावाखाली विविध औषधं मागवली.
दरम्यान दोन दिवसांनी फिर्यादी शुभांगी पवार यांनी आपल्या नवऱ्याचं मृत्यूचं प्रमाणपत्र पाहिलं. तेव्हा संबंधित प्रमाणपत्रावर 21 एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद त्यांना आढळली. त्यानंतर शुभांगी पवार यांनी गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचारबाबतचा तपशील मागितला. पण डॉक्टरांनी पुन्हा 40 हजार रुपयांची मागणी केली. अखेरीस शुभांगी यांनी न्यायालयात धाव घेतली.