पुणे – ध्वनी प्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. त्यामुळे जनजागृती आवश्यक असल्याचा निर्धार करत कान-नाक-घसा तज्ज्ञांनी एकजूट करत रॅलीचे आयोजन केले. यावेळी “इसोकॉन’ संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप करण्यात आला.
तीन दिवसांच्या परिषदेत श्रवणशक्ती कमी होणे आणि बहिरेपणा, त्याचे निदान, शस्त्रक्रिया व्यवस्थापन आणि त्याचे पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. निदानातील अलीकडील प्रगती आणि नवीनतम शस्त्रक्रिया प्रक्रियेवर देखील या परिषदेत चर्चा आणि प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या परिषदेला देशभरातून सुमारे एक हजार तज्ज्ञ सहभागी होते. अमेरिका, इटली, यूके आणि व्हिएतनाम या देशातील तज्ज्ञांना ओटोलॉजी (कानाशी संबंधित समस्या) क्षेत्रातील त्यांचे अनुभव आणि कौशल्य सादर करण्यासाठी आमंत्रित केले होते.
तरुण डॉक्टर्स आणि वरिष्ठ सल्लागार यांच्यात ज्ञानाचा प्रसार करण्याच्या परिषदेच्या उद्दिष्टांसोबतच या परिषदेने ध्वनी प्रदूषण आणि जन्मजात बहिरेपणा आणि लवकर निदान याविषयी जागरुकता आणण्याच्या दृष्टीने परिषदचे आयोजन करण्यात आले, असे असे डॉ. गौरी बेलसरे, डॉ. विजय सोनवणे आणि डाॅ. अविनाश वाचासुंदर यांनी सांगितले.