नवी दिल्ली – प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध बोगस खटले दाखल करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर राजकीय हेरगिरी केल्याच्या आरोपावरून सीबीआयला खटला भरण्यास अनुमती दिली आहे. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.
ते म्हणाले की, आम आदमी पक्ष जितका विस्तारत जाईल तितके आमच्यावर असे खोटे खटले दाखल केले जातील. भारतीय जनता पक्षाने या आधीच दिल्ली सरकारच्या उत्पादनशुल्क धोरणात गैरव्यवहार झाल्याच्या कारणावरून सिसोदियांना टार्गेट केले होते.
त्यांना अनेक वेळा ईडी आणि सीबीआय कडून चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. आणि त्यांच्या घरावर अनेक वेळा छापेमारी करण्यात आली. परंतु त्यात काही निष्पन्न झाले नाही.
उत्पादनशुल्क धोरणावरून शेवटी जे आरोपपत्र दाखल करण्यात आले त्यातही सिसोदियांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात ईडी आणि सीबीआयला अपयश आले. आता त्यांच्या मागे हे नवीन प्रकरण लावण्यात आले आहे.