पिंपरी – एका खून प्रकरणाशी संबंधित असलेल्या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम प्रकरणातून झालेल्या खून प्रकरणात एका तरुणीची बदनामी करणारे अनेक मेसेज, फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अशा प्रकारे सोशल मीडियावर बदनामी करणारे मेसेज, फोटो कोणी पोस्ट करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त विनायक ढाकणे यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूनाची घटना घडली होती. या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या एका तरुणीचे फोटो आणि जातीय तणाव निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्या आहेत. आता या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे देण्यात आला आहे.