मुंबई – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीसिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी एका पोलीस निरीक्षकाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून केली आहे.
सध्या अकोले येथे नियंत्रण कक्षात असणारे निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी पोलीस महासंचालकांना 20 एप्रिलला पत्र पाठवूून ही तक्रार नोंदवली आहे. त्याची प्रत त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पाठवण्यात आली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवून गृहरक्षक दलाचे पोलिस महासंचालक बनवलेल्या परमवीरसिंग यांच्यावर पोलीस दलातून दाखल झालेली ही दुसरी तक्रार आहे. यापुर्वी मुंबईचे पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनीही अशी तक्रार दाखल केली होती.
परमवीरसिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना ते अनेक पातळीवरच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभागी होत असत, असे पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या 14 पानी पत्रात घाडगे यांनी नमूद केले आहे. घाडगे यांनी या पत्रात या वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यावर आरोपांची मालिकाच लावली आहे. त्यात भूखंड व्यवहारातील त्यांचा सहभाग, सरकारी निवासस्थानाचा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांचा गैरवापर यासह भ्रष्टाचाराच्या अनेक मार्गांचा उल्लेख केला आहे.
सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना आपण तेथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होतो. या सर्व भ्रष्टाचाराचे आपल्याकडे पुरावे असून आपल्याला चौकशीसाठी ज्यावेळी बोलावले जाईल, त्यावेळी ते आपण सादर करू, असे घाडगे यांनी सांगितल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.