पिंपरी – समाजात तेढ निर्माण करणारी बेताल वक्तव्ये करणारे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करा, असा तक्रारी अर्ज मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी दिला आहे. वाकड पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रारी अर्जात ही मागणी करण्यात आली आहे.
सतीश काळे यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, वकिलीच्या माध्यमातून लोकांना न्याय देणे अपेक्षित आहे. मात्र, गुणरत्न सदावर्ते वकिलीचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करण्याची कामे करत आहेत. बेताल वक्तव्यामुळे तसेच बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी न्यायालयाने सदावर्तेची वकिलीची सनद देखील दोन वर्षांसाठी रद्द केलेली आहे.
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून करोडो मराठा बांधव स्वेच्छेने सभेसाठी जमले होते. या मराठा बांधवांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रकार गुणरत्न सदावर्ते याच्याकडून केले जात आहे. सदावर्तेला मराठा समाज बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.