लोकांसमोर मारला कुत्र्यांवर ताव
लाखणगाव – जारकरवाडी-ढोबळेवाडी (ता. आंबेगाव) येथे भरवस्ती नजीक दोन बिबट्याचा वावर आहे. ग्रामस्थ बॅटरीच्या उजेडात बिबट्याला पाहण्याचा प्रयत्न करत असताना दहा ते पंधरा लोकांच्या गर्दीसमोर बिबट्या कुत्र्यांवर ताव मारत असल्याचे दिसून आले. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री घडली. ढोबळेवाडी येथे भरवस्तीत कळमजाई मातेचे मंदिर आहे. या मंदिरामागे ओढ्यालगत उसाचे पीक आहे. हे ठिकाण भरलोकवस्तीत आहे. गेले तीन दिवस रात्री नऊ ते साडेनऊ दरम्यान बिबट्या लोकांना दिसून आला होता; पण तोपर्यंत त्याने कधीच कशाची शिकार केली नव्हती. रात्री उशिरा मात्र त्याने एका कुत्र्याची शिकार केली.
आवाज आल्याने नागरिक धावले असता बिबट्याने भक्ष्यासह मंदिर परिसराकडे धूम ठोकली. लोकांनी पाठलाग केला, त्यावेळी बिबट्याने लोकांसमोरच ठाण मांडून दोनशे मीटरच्या अंतरावर झाडांत कुत्र्याचा फडशा पाडला. दोन बिबटे असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली असून, या परिसरात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांना पकडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.