फेरारीने आपली नवी स्पोर्ट्स कार ‘रोमा’ नुकतीच भारतामध्ये लाँच केली आहे. आपल्या शानदार स्पोर्ट्स कार्ससाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या इटालियन कार मेकर फेरारीची ही सुपर कार देखील पाहता क्षणी डोळ्यात भरावी अशीच आहे. पाहुयात या कारचे फीचर्स…
फेरारीच्या रोमा या सुपर कारमध्ये जबरदस्त ताकदीचं ४.० लिटर टर्बो व्ही-८ इंजिन लावण्यात आलंय. हे इंजिन ६२० बीएचपी पावर आणि ७६० एनएम पीक टॉर्क देतं. यासोबतच सॉफ्ट ट्रान्समिशनसाठी ८ स्पीड गियरबॉक्स देण्यात आलाय.
फेरारीने ही कार बनवण्यासाठी विशेष मेहनत घेतली असून कारचे ७० टक्के पार्ट्स नव्या टिक्नॉलॉजीवर आधारित आहेत. सजावटीच्या दृष्टीने देखील अनेक बदल करण्यात आलेत.
स्पोर्ट्स कार म्हंटल्यानंतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्पीड. फेरारी रोमा स्पीडच्या आघाडीवर अत्यंत तगडी असून ही ताशी ३२० किमी इतक्या वेगाने धावू शकते. ० ते १०० एवढा स्पीड पकडण्यास रोमाला केवळ ३.४ सेकंड एवढा वेळ लागतो. ही कार ग्लोबल लेव्हलला २०२० मध्ये लाँच करण्यात आली होती. मात्र आता तब्बल एका वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही भारतामध्ये लाँच करण्यात आलीये.
फेरारी रोमा ही फोर सीटर कार असून पुढील बाजूस ड्रायव्हर व पॅसेंजरसाठी दोन सीट्स देण्यात आलेत. मागील बाजूस देखील दोन सीट्स आहेत मात्र ही आकाराने लहान असल्याने त्यांचा वापर साहित्य ठेवण्यासाठी अथवा लहान मुलांना बसण्यासाठीच वापरली जाऊ शकतात.
फेरारी रोमा इंटेरियरच्या बाबतीतही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाने सज्ज असून यामध्ये ८.४ इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आलाय. या कारची भारतातील एक्स शोरूम किंमत ३.६१ कोटी इतकी ठेवण्यात आलीये.