पुणे (धिंरेद्र गायकवाड)- पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्या प्रभागांची रचना जाहीर झाल्यानंतर जुना प्रभाग क्र.38 बालाजीनगर हा नव्याने प्रभाग क्र. 49, बालाजीनगर- के.के. मार्केट असा झाला आहे. या प्रभागामध्ये नव्याने बिबवेवाडीचा 30 ते 35 टक्के भाग जोडल्याने येथील मतदार संख्या वाढली आहे.
स्वारगेट-सातारा रस्त्याने कात्रजकडे जाताना डाव्या बाजूकडील भाग म्हणजे हा प्रभाग असे भौगीलिकदृष्टया सांगता येईल. या प्रभागामध्ये खरी रंगत ही मागच्या पंचवार्षिक प्रमाणे याही वर्षी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच असणार आहे. नव्याने समाविष्ट बिबवेवाडी भागातील विद्यमान नगरसेवक या प्रभागातून निवडून येण्यासाठी लढतील. तर, या प्रभागातून दोन विद्यमान नगरसेवक त्यांचा भाग तुटल्याने, तो भाग ज्या प्रभागामध्ये आहे. त्या प्रभागातून यावेळी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे.
यावेळी जुनेच नगरसेवक पुन्हा निवडून येणार की तीन नव्या उमेदवारांना महापालिकेत जाण्याची संधी मिळणार, अशी स्थिती आहे. कारण, यावेळी या प्रभागातून सर्व उमेदवार हे विद्यमान नगरसेवक असून भाजप व राष्ट्रवादीमधून कोणत्या नव्या उमेदवारांना संधी मिळणार. यावर सर्व अवलंबून आहे.
प्रभागातील समाविष्ट भाग
महर्षींनगर, वसंत बाग सोसायटी, प्रेमनगर, पुनम हाइट्स, ऐश्वर्या पार्क, जयवर्धन सोसायटी, राजश्री शाहू सोसायटी, संगम सोसायटी, जेधेनगर, पद्मावती नगर, बिबेवाडी भाग, श्री संत एकनाथ नगर, शोभा सवेरा, शिवशंकर सोसायटी, लोअर इंदिरा नगर, पद्मावती, सतनाम विवेक नगर, नवकार रेसिडेन्सी.
विद्यमान नगरसेवक
गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष काम
राजीव गांधी नगर येथे अत्याधुनिक सर्व सोईयुक्त सुसज्ज असे 50 खाटांचे अतिदक्षता विभाग असणारे हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आहे, ते लवकर सुरू करणार. प्रभागातील सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण केले. सर्व ठिकाणी ड्रेनेजलाइनची उत्तम व्यवस्थेची कामे करण्यात आली आहेत. दत्तात्रय धनकवडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
युवक-युवतींसाठी लाइट हाऊस प्रोजेक्ट प्रथम केला, त्यामार्फत दोन ते तीन हजार युवक-युवतींनी प्रशिक्षण घेत ते स्व:च्या पायावर उभे आहे. भाजी विक्रेत्यांसाठी ओटा मार्केट केले. ड्रेनेजची समस्या दूर गेली. लेकटाउन येथील चौकामध्ये योग शिल्प केले व त्याचबरोबर दोन वाचनालय सुरू केले. राणी भोसले (भाजप)
संत रोहिदासमठ महादेवनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या 70 लक्ष पाण्याची टाकी. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम क्रिडासंकुल, राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय इमारत, पोलीस चौकी व महिला बचत गट कार्यालय. नाना-नानी उद्यान, अशी अनेक कामे पूर्ण केली आहेत. प्रकाश कदम (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
पोस्ट ऑफिसची इमारत तयार केली, त्याच बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र साठेची इमारत तयार केली आहे. त्यामध्ये आता लसीकरण सुरू आहे. भाजी मंडई, योग केंद्र तयार केली. कात्रज तलाव येथे ड्रेनेज पाणी जात होते ते अडवून त्यासाठी 10 कोटींची पाइपलाइन टाकण्यात आली. मनीषा कदम (भाजप)
गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…
प्रभागामध्ये भाजी मंडईची उणीव आहे. प्रभागामध्ये वाहनाच्या पार्किंगची व्यवस्था नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी, मुलांसाठी खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध नाहीत. ज्येष्ठ नागरिकांसाठी विसंगुळा केंद्रे एकही नाही. त्यामुळे जनतेने संधी दिली तर परिसरातील ही कामे करण्याकडे माझा भर असेल. दिगंबर डवरी (भाजप)
सत्ताधारी भाजप नगरसेवकांकडून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. फक्त सुशोभिकरणाची कामे प्रभागामध्ये करण्यात आली आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जे आवश्यक आहे, असे कोणतेही ठोस काम झालेले नाही. वैशाली खुटवड (राष्ट्रवादी)
मागील पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकांनी पैसे देऊन मते घेतली. निवडून आल्यानंतर अशा उमेदवारांनी त्या मतदारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. आता, या भागामध्ये अजूनही कचरा, ड्रेनेज तुंबण्याची समस्या कायम आहे. यावेळी संधी मिळाली तर या समस्या सोडवू. विनय कदम (भाजप)
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नावात साधर्म्य असल्याने अवघ्या शंभर, सव्वाशे मतांनी पराभव झाला. मात्र, हताश न होता तेंव्हापासून प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवायची कामे पाठपुराव्यातून केली. आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मनीषा मोहिते (राष्ट्रवादी)
2022 निवडणुकीसाठी इच्छुक
भाजप : विद्यमान नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, राणी भोसले तर नवे इच्छुक समीर धनकवडे, दिगंबर डवरी. राष्ट्रवादी कॉंग्रेस ः विद्यमान नगरसेवक दत्तात्रय धनकवडे तर नवे इच्छुक राजेंद्र बर्गे, मिलिंद पन्हाळकर, गौरव घुले. शिवसेना : सरोज कर्वेकर, विनायक वाळके. मनसे : सचिन काटकर, मंगेश रासकर.