आंबेगाव बुद्रुक – करोनामुळे कुस्तीक्षेत्र व मल्लही अडचणी आले. दोन वर्षापासून नामवंत मैदाने होत नसल्यामुळे कुस्ती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. उदयोन्मुख व गरजू मल्लांना करोनाने चितपट केल्यानंतर प्रथमच पुणे शहरात मोठ्या कुस्ती मैदानाचे आयोजन जांभूळवाडी येथे करण्यात आले आहे.
कुस्ती हा युक्ती आणि बुद्धीचा खेळ आहे. या कुस्ती खेळाचे प्रदर्शन विशेषतः यात्रांमध्ये होते. यातून मल्लांना आर्थिक मदत होते. मल्ल आपला खेळ दाखवण्यासाठी विविध मैदानात जातात. या कुस्ती खेळात सामान्य कुटुंबातीलच मुले असल्याने या खेळावर त्यांच्या घराचाही कारभार चालत असतो, त्याच बरोबर या कुस्ती प्रदर्शित करण्याच्या काळासाठी ही पैलवान मंडळी आतुरतेने सातत्याने सराव करीत असतात.
या कालावधीत त्यांना जवळपास प्रत्येकी एक लाख रुपयांचा खुराक आवश्यक असतो, तो ही या यात्रांमधूनच ते जमवतात.
करोनामुळे कुस्ती खेळ अडचणीत आल्यानंतर पैलवानांना सराव नाही, घरची परिस्थिती बेताची असल्याने आवश्यक खुराक नाही, मैदाने रद्द झाली असल्याने खुरकाचीही सोय होत नव्हती. त्यामुळे पुणे शहरात जांभूळवाडी येथे गेल्या दोन वर्षांत मोठे मैदान भरत आहे. पहिल्यांदाच लाल मातीत होत असणाऱ्या प्रथम क्रमाकची कुस्ती पै. बालारफिक शेख व पै. सिकंदर शेख व पै.गणेश जगताप व पै. माऊली जमदाडे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर महीलांच्याही निमंत्रित कुस्त्या होणार आहेत.
कुस्ती मैदान येथे होणार…
जांभूळवाडी रोडवरील दत्तनगर चौकात सोमवारी (दि.28) पंचक्रोषी कुस्ती मैदानाचे आयोजन अर्जुन पुरस्कार विजेते काका चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पै. राजेश जांभळे, पै.शरद पवार, पै.संदीप रास्कर, पै. गणेश मोहोळ यांनी केले असून या मैदानात पुरुष व महिलांच्या चित्तथराक निमंत्रातीत 50 लढती होणार आहेत. संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन होणार असल्याचे आयोजक व राष्ट्रीय खेळाडू संदीप रासकर यांनी सांगितले.