लोकसंख्या स्थिरतेसाठी महिला साक्षरता हाच उपाय

आ. पृथ्वीराज चव्हाण : महिला महाविद्यालयात साधला युवतींशी थेट संवाद

कराड – “”भारताची मोठी शक्ती म्हणजे युवाशक्ती आहे. राज्यघटनेने भारतातील प्रत्येकाला समान अधिकार दिले आहेत. आपल्या देशातील लोकसंख्या स्थिरतेसाठी महिला साक्षरता हा रामबाण उपाय आहे,” असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. युवकांच्या मनात काय आहे, हे जाणण्यासाठी आ. चव्हाण यांनी “युवा संवाद’ कार्यक्रमात सद्‌गुरु गाडगे महाराज व बापूजी साळुंखे महाविद्यालयापाठोपाठ शुक्रवारी कराडच्या महिला महाविद्यालयात जाऊन युवक- युवतींशी थेट संवाद साधला.

शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, प्राचार्या स्नेहल प्रभुणे यांची उपस्थिती होती. आ. चव्हाण यांनी आपल्या आयुष्याचे विविध पैलू उलगडत युवतींशी स्थानिक पातळीपासून देश व जागतिक पातळीपर्यंतच्या घडामोडींविषयी संवाद साधला. आ. चव्हाण म्हणाले, “”आपल्या महिला कॉलेजचे शिक्षण व सबलीकरण हे ब्रीदवाक्‍य युवतींसाठी महत्वाचे आहे. राज्यघटनेने भारतातील प्रत्येकाला समान अधिकार दिले आहेत.

दरडोई उत्पन्न वाढले तरच देशाचा आर्थिक विकासदर सुधारेल. आपल्या देशातील दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आपला आर्थिक विकास दर सुधारला पाहिजे. देशातील आर्थिक मंदीचा परिणाम रोजगारावर होत आहे.” पक्षांतरामुळे भारतातील लोकशाही टिकेल का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, “आपली संसदीय प्रतिनिधिक पध्दती आहे. सध्याच्या सरकारचे विरोधी पक्ष संपवायचे काम सुरु आहे. नेत्यांनी पक्षांतर केले असले, तरी जनता त्यांच्यामागे गेली नाही.’ निवडणुकीत पक्ष व उमेदवार आश्‍वासने देतात, पण पुढील पाच वर्षात काहीच करत नाहीत, या प्रश्‍नावर ते म्हणाले, “मी या विभागात कारखाना आणायचा प्रयत्न केला. पण जमिनी देण्यासाठी लोकांनी विरोध केला.’

शिक्षणाची सद्यस्थिती सुधारण्यासाठी काय उपाययोजना असाव्यात, या प्रश्‍नावर ते म्हणाले, “”एकूण अर्थव्यवस्थेतील सहा टक्के खर्च शिक्षणावर केला पाहिजे. राज्याचा विकास करायचा सोडून सरकारने बुलेट ट्रेनला प्राधान्य दिले आहे. आज आपल्याला रस्त्यातील खड्डे भरता येत नाहीत व हे सरकार बुलेट ट्रेन आणत आहेत. हा खरोखरच विरोधाभास आहे. वाढत्या गुंडगिरीवरील नियंत्रणासाठी झुंडशाही विरुध्द कायदा करण्याची गरज असावी का याचा विचार करणे गरजेचे वाटत, असे उत्तर त्यांनी दिले. कराडच्या विकासाबाबतच्या प्रश्‍नावर त्यांनी “कराड जिल्हा व्हावा हे आमचे स्वप्न आहे. यासाठी कराडात प्रशासकीय इमारती आणल्या,’ असे स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)