पुणे – शिंदवणे घाटातील रस्त्यालगतच्या झुडपामध्ये स्त्री जातीचे दोन दिवसांचे अर्भक आढळून आले आहे. गुरुवारी सायंकाळी येथून दुचाकीवरून जाणाऱ्या एकाने पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अजित सणस यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शिंदवणे गावातून घाटाकडे जाणाया रस्त्यालगत असलेल्या झुडपात अर्भक ठेवले होते. गुरुवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुुमारास येथून एकजण दुचाकीवरून जात होता.
त्यावेळी त्याला रडण्याचा आवाज आल्याने त्याने गाडी थांबवून पाहीले असता अर्भक आढळून आले. त्याची माहिती पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अर्भक बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड करीत आहेत.