जामखेड -करोनामुळे नागरिक भयभीत झाले असून, लॉकडाऊन वाढत असल्याने ग्रामीण भागातील कामधंद्यासाठी पुणे, मुंबई यांसारख्या शहरांत गेलेले नागरिक गावाकडे परतत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इतर शहरांतून तालुक्यात दररोज अनेक जण दुचाकी, चारचाकी वाहनाने, तर काही जण पायी येत आहेत. मात्र तपासणी नाक्यांवर त्यांची नोंदणी केली जात नसल्याने बाहेरून येणारे थेट गावात प्रवेश करीत आहेत. आधी पुणे-मुंबईहून कुणी आले की, गोतावळा एकत्रित येऊन खुशाली विचारायचे. करोनामुळे दिवस काहीसे बदलले आहेत. जामखेडमध्ये कुणी आले तर नाही ना, याबद्दलची सध्या सर्वांमध्ये धास्ती वाढल्याचे दिसत आहे.
जामखेड शहरात सर्वांत प्रथम 29 मार्च रोजी दोन परदेशी नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांच्या संसर्गातून जामखेड शहरात एकूण 17 जण कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यापैकी 15 जण स्थानिक होते. या 15 करोनाबाधितांपैकी 13 जण मागील आठवड्यात करोनामुक्त झाले आहेत, तर एका वयोवृद्ध व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने 10 एप्रिलपासून जामखेड शहर हॉटस्पॉट घोषित होते.
जवळपास एक महिना जामखेड कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. यानंतर शेवट 17 वा राहीलेला रुग्ण हा नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र त्याचा चौदा दिवसांनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर पुन्हा सात दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर सात दिवसांनंतर 16 एप्रिलचा अहवाल निगेटिव्ह आल्याने या शेवटच्या रुग्णास 17 एप्रिल रोजी नगर येथील जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीला जामखेड शहर हे करोना मुक्त झाले आहे.
शासनाने शहरात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून न दिल्याने त्यांनी आपापल्या गावी पायी जाण्याचा निर्णय घेऊन पायीच गावाकडे निघाले आहेत. तालुक्यात शहरांतून लोक येत असल्याने ग्रामस्थांनी अशा लोकांसाठी गावाबाहेर शाळांमध्ये होम क्वारंटाईन करण्याची व्यवस्था केली आहे.
परंतु काही नागरिक विरोध दर्शवून थेट गावात प्रवेश करत आहेत. गावाच्या हद्दीत येण्यापूर्वी आरोग्य विभागाने तपासणी नाक्यांवर होम क्वारंटाईनचे शिक्के मारणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. तालुक्यातील अनेक गावांत मुंबई, पुणे, औरंगाबाद यांसारख्या रेड झोनमधून शेकडो नागरिक डेरेदाखल होत असल्याने स्थानिकांना आपल्याला करोनाची लागण होते की काय, याची धास्ती वाटत आहे.