Salman Khan – दबंग सलमान खानचा बहुचर्चित ‘टायगर 3’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमारे 44 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि जगभरातील 100 कोटी क्लबच्या अगदी जवळ आहे. प्रेक्षकांमध्ये ‘टायगर 3’ ची जबरदस्त क्रेझ आहे. अशात ‘भाईजान’च्या काही चाहत्यांनी चक्क थिएटरमध्येच फटाके फोडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. दरम्यान आता सलमानने चाहत्यांना सल्लाही दिला आहे.
I’m hearing about fireworks inside theaters during Tiger3. This is dangerous. Let’s enjoy the film without putting ourselves and others at risk. Stay safe.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) November 13, 2023
वास्तविक, हे प्रकरण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका चित्रपटगृहातील आहे. इथे ‘टायगर 3’च्या स्क्रिनिंगदरम्यान प्रेक्षकांनी फटाके फोडायला सुरुवात केली. चित्रपटगृहात फटाके फोडण्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. यानंतर याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर दोघांना ताब्यातही घेतले आहे.
या घटनेबाबत जेव्हा सलमान खानला कळली तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता ट्विट करत चाहत्यांना सल्ला दिला. ‘भाईजान’ने लिहिले की, ‘मी टायगर 3 दरम्यान थिएटरमध्ये फटाके जाळल्याबद्दल मला कळले. हे धोकादायक आहे. स्वतःला कोणत्याही धोक्यात न घालता चित्रपटाचा आनंद घ्या आणि सुरक्षित रहा.” यानंतर लोक यावर जोरदार कमेंट करत आहेत आणि फटाके फोडण्याचा व्हिडिओ शेअर करत आहेत. लोकही सलमान खानच्या मुद्द्याला पाठिंबा देत आहेत आणि यावर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटाने सनी देओलच्या ‘गदर 2’ला टक्कर दिली आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट ‘गदर 2’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतात 40 कोटींचा व्यवसाय केला. तर चित्रपटाचे एकूण कलेक्शन 525 कोटी होते. त्याचवेळी ‘भाईजान’ चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात जवळपास 44 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता ‘टायगर 3’ बॉक्स ऑफिसवर किती मजल मारतो हे पाहायचे आहे.