चंदिगढ – कार दुभाजकाला धडकल्याने भीषण अपघात होऊन प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास अमृतसर-जालंधर जीटी रोडवरील जंडियाला गुरू पुलाजवळ घडली. दिलजान असे अपघातात मृत्यू पावलेल्या गायकाचे नाव आहे.
जंडियाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे गायक दिलजान आपल्या कारमधून अमृतसरहून कतारपूरच्या दिशेने जात होता. जीटी रोडवर त्याच्या कारचा वेग जास्त असल्याने कार पुलाजवळ पोहोचताच अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकली. अपघातानंतर लोकांनी त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
दिलजानचे नवीन गाणे 2 एप्रिलला रिलीज होणार आहे. सोमवारी तो या संदर्भातील बैठकीला हजर राहण्यासाठी आपल्या महिंद्रा केयूडी कारमधून अमृतसरला गेला होता. बैठकीवरून परतत असताना त्याचा अपघातात मृत्यू झाला. दिलजानच्या मृत्यूमुळे कुटुंबासह चाहत्यांमध्ये दुख:चे वातावरण आहे.