मारहाण करणारांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन
वाई – यशवंतनगर, ता. वाई येथे रस्त्याच्या वादातून एका कुटुंबातील सर्वांना लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याची घटना घडली असून यामध्ये आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण करतानाची व्हिडिओ क्लिम समाज माध्यमांवर फिरल्याने तणाव निर्माण झाला होता. यातूनच सकल मराठा समाजाने वाई पोलीस ठाण्यासमोर मारहाण करणारांना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. यामुळे परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी जमावाला शांत केल्यानंतर वातावरण निवळले असून याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करत तिघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई -सातारा रस्त्यावर यशवंतनगर गावच्या हद्दीत मानकुंबरे वस्तीवर जाण्याच्या येण्याच्या रस्त्यावरून शामराव मानकुंबरे व मोहन जाधव या दोन शेजाऱ्यांमध्ये पूर्वी पासून वाद आहेत. रस्त्यावरून त्या दोघांमध्ये न्यायालयात खटला सुरू आहे. मोहन जाधव यांनी नुकतीच मानकुंबरे वस्तीलगत जागा खरेदी केली आहे. त्याला जाण्या येण्याचा रस्ता नाही. त्यामुळे ते मानकुंबरे यांच्या मालकीच्या रस्त्यावरूनच जाणे येणे करत होते. बुधवारी सकाळी मोहन जाधव यांनी आपल्या जागेमध्ये बोअर घेण्यासाठी वाहन मागवले होते.
वाहन आत घेऊन जाण्यासाठी त्यांनी मानकुंबरे यांना गेट उघडण्यास सांगितले. मात्र या गेटमधून संबंधित गाडी जाणार नव्हती. त्यामुळे मानकुंबरेनी या गाडीला आत जाण्यास विरोध केला. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्याचे मारामारीत रूपांतर झाले. मारहाणीत मोहन जाधव यांच्या समवेत असलेल्या अकरा जणांनी मानकुबंरे यांच्या घरातील आठ पुरुष व महिलांना लोखंडी रॉड लाकडी दाडक्यांनी जोरदार मारहाण केली. तसेच गाडयांच्या काचा फोडून गाड्यांचेही नुकसान केले. यामध्ये मानकुंबरे यांच्या कुटुंबातील शामराव मानकुंबरे, संदीप मानकुंबरे, रेखा संतोष मानकुंबरे, भाग्यश्री मानकुंबरे, गणेश मानकुंबर,े सोनाली मानकुबंरे व कलावती मानकुबरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मानकुंबरे कुटुंबीयांना मारहाण झाल्याची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर फिरल्याने व याची माहिती वाई शहरात पसरताच पोलीस ठाण्याच्या आवारात सकल मराठा व इतर समाजाच्या नागरिकांनी गर्दी केली होती.
मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केले यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात मोहन सावकार, जाधव सावकार, किरण घाडगे, रॉकी घाडगे यांच्यासह सदाशिव जाधव, लखन जाधव, पवन उर्फ पांग्या जाधव, सचिन जाधव, उज्वला मोहन जाधव, प्रिया उर्फ प्रिया लखन जाधव, राधा जाधव, काजल सचिन जाधव अशा अकरा जणांवर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आज दिवसभर पोलीस ठाण्याच्या आवारातील तणावपूर्ण वातावरण होते .अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण करत आहेत.