‘सोशल मीडियावरची खोटी माहिती आरोग्य व्यवस्थेला घातक’

वॉशिंग्टन – खोटी माहिती ही लसीकरण मोहिमेसाठी घातक ठरु शकते, असे मत अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्‍टर विवेक मूर्ती यांनी व्यक्त केल्यानंतर त्या देशाचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही अशाच प्रकारची भूमिका मांडली आहे.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला खोट्या माहितीमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेतील नागरिकांमध्ये विषाणूचा मोठ्याप्रमाणात होणारा प्रादुर्भाव आणि त्यांचे गंभीर परिणाम हे केवळ लसीकरणाच्या माध्यमातून टाळता येऊ शकतात, असे मत मूर्ती यांनी व्यक्त केले होते.

बायडेन यांना पत्रकारांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान याचसंदर्भात प्रश्न विचारला. खोटी माहिती पसरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्‌ससाठी तुमचा काही संदेश आहे का? असे बायडेन यांना पत्रकारांनी विचारले.

बायडेन यांनी त्यावर उत्तर देताना, ते लोकांना मारत असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. सध्या आपल्याकडे केवळ लसीकरण न झालेल्यांना साथीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचेही बायडेन म्हणाले.

मूर्ती हे अमेरिकेच्या करोना टास्क फोर्सचे सदस्य आहेत. आपल्या देशातील आरोग्य व्यवस्थेला चुकीच्या माहितीमुळे मोठा आणि गंभीर धोका असल्याचे मूर्ती म्हणाले. अनेकांचे जीव माहितीवर अवलंबून असतात. त्यामुळे एक देश म्हणून आपण चुकीच्या माहितीविरोधात एकत्र आले पाहिजे, असेही मूर्ती यांनी स्पष्ट केले.

खोटी, चुकीची माहिती पसरवण्यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल बोलताना मूर्ती यांनी कंपन्यांनी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसने त्यांच्या प्रोडक्‍टमध्ये आवश्‍यक ते बदल करुन चुकीच्या माहितीचा प्रसार होणार नाही आणि योग्य माहितीची लोकांपर्यंत पोहचेल याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा मूर्तींनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.