पिंपरी (उमेश अनारसे ) – केंद्र शासन ऑनलाइन औषध विक्रीला परवानगी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया व विविध ऑनलाइन साइटवर औषधांच्या तसेच सौंदर्य प्रसाधने आणि सर्जिकल साहित्यांच्या जाहिराती होऊ लागल्या. यातून औषधविक्री करणाऱ्या होलसेल एजन्सी व रिटेलर औषध विक्रेत्यांनी औषधे खरेदी केली. जेव्हा अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मेडिकलची पाहणी करण्यात आली तेव्हा काही औषधे नकली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. अधिक नफ्याच्या हव्यासापायी नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळण्याचे काम काहीजण करत आहेत.
ऑनलाइन साइटवर मोठ्या प्रमाणावर औषधांवर डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे औषधविक्री करणारे मेडिकल, होलसेल एजन्सी आणि नागरिकांनी अशा साइटवरून औषधांची खरेदी केली आहे. परंतु ही खरेदी करताना आपल्याकडे येणारी औषधे दर्जेदार, योग्य आहेत की नाही याची शहानिशा केली नाही.
त्यांच्याकडे तशी व्यवस्था देखील नाही. परंतु आपण औषध खरेदी करताना ज्या कंपनीचे औषध घेत आहोत ती कंपनी अस्तित्वात आहे की नाही ? हे पाहण्याची तसदी देखील घेतली जात नाही. ऑनलाइन औषधांची खरेदी केल्यानंतर बिल मिळत आहे. परंतु बिलावर नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्षात औषधांची विक्री करणारी फर्मच नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. अशा बोगस कंपन्यांकडून औषध खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
महाराष्ट्रामध्ये बनावट औषधांची विक्री होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने मेडिकल व एजन्सींची पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले. बऱ्याच नामांकित कंपन्यांची औषध तोतया कंपन्यांनी तयार करून मार्केटमध्ये विक्री केली आहे. या विक्रीचे केंद्र गुजरात, दिल्ली, वाराणसी, आग्रा आदी ठिकाणी दिसून येत आहे. परंतु ऑनलाइन औषध खरेदीतून मिळालेल्या बिलाच्या माध्यमातून चौकशी केली असता संबंधित ठिकाणी अशी कोणतीही फर्म दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अथवा व्यावसायिकांनी माहीत नसलेल्या ठिकाणावरून व पैशांची बचत होत आहे म्हणून कुठूनही औषधांची खरेदी करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
चेकद्वारे पेमेंट करा
मेडिकल चालक अथवा होलसेल एजन्सी जेव्हा औषधांची खरेदी करते तेव्हा त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकृत एजन्सीकडून माल खरेदी करावा. जर बाहेरून कुठून माल घ्यायचा असेल तर संबंधित फर्मची माहिती घेऊन ती त्या ठिकाणी अस्तित्वात आहे की नाही याची शहानिशा करावी. तसेच कोणत्याही मालाचे पेमेंट देताना कॅश अथवा गूगल पे न करता चेक अथवा नेट बॅंकिंगद्वारे पेमेंट केले तर संबंधित व्यक्तीचा शोध घेणे सहज शक्य होणार आहे.
पैशांपेक्षा आरोग्य महत्त्वाचे
सध्या युगात प्रत्येकाला डिस्काउंट हवा आहे. खर्च अमाप वाढला आहे. त्यामुळे पैशांची बचत अथवा जेथे डिस्काउंट सुरू आहे तेथून खरेदी करण्याचा हव्यास असतो. परंतु पैशांच्या बचतीपेक्षा दर्जेदार औषधांची खरेदी करणे गरजेचे आहे. त्यातून आपले आरोग्य सुरक्षित राहील. यातून आपल्या आरोग्याबरोबरच पुढील काळातील वैद्यकीय खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी बनावट औषधांची विक्री करण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये ऑनलाइन साइटवरून औषध खरेदी केल्यामुळे हा प्रकार घडला आहे. या बिलावरून संबंधित फर्मची चौकशी केली असता त्या ठिकाणी फर्म अस्तिवात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे होलसेल एजन्सी अथवा मेडिकलचालकांनी अवैध ठिकाणावरून औषधांची खरेदी करू नये. तसेच ऑनलाइन खरेदी टाळावी. पेमेंट चेक अथवा नेट बॅंकिंगद्वारे केले तर अशा प्रकारांना आळा घालता येईल.
– श्याम प्रतापवार, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे.
मेडिकलचालकांनी स्थानिक होलसेल औषध विक्रेत्यांकडून औषधांची खरेदी करावी. तसेच होलसेल विक्रेत्यांनी देखील कंपनीच्या अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावी. ऑनलाइन औषध खरेदीला थारा देऊ नये. डिस्काउंटपेक्षा आरोग्य महत्त्वाचे आहे. सध्या महाराष्ट्रात परराज्यांमधून मोठ्या प्रमाणावर बनावट औषधे येत आहेत. याला आळा घालण्यासाठी नागरिकांसह, होलसेल, रिटेलर सर्वांनीच अधिकृत ठिकाणावरून औषधांची खरेदी करावी.
– रवी पवार, अध्यक्ष पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशन.