पुणे – जम्मू-काश्मीरमधील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याच्या नावे बनावट शस्त्र परवाना देणारे रॅकेट वानवडी पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या बनावट परवान्याच्या आधारे शहरात बाउंसर, सिक्युरिटी आणि एटीएमला कॅश पुरवणाऱ्या व्हॅनवर सिक्युरिटी म्हणून काम करणाऱ्या परराज्यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे गावठी पिस्तूल, 12 सिंगल बोर रायफल, 56 जिवंत राउंड/काडतुसे आणि तीन बनावट शस्त्र परवाने जप्त करण्यात आले.
संतोष जैनाथ शुक्ला (50, रा. हडपसर, मूळ प्रयागराज), रामप्रसाद पासवान (35, रा. भिंगारवाडी, ता. पनवेल), राजेश बबलु पासवान (35), दिनेश जगदीश पासवान (54, तिघेही रा. फतेपूर उत्तर प्रदेश) इम्रान मोहमद जिमी खान (30), मोहंमद बिलाल मोहंमद निसार (30), साहिल कुमार चमनलाल शर्मा (25), गीतम देशराय शर्मा (23 सर्व रा. राजोैरी, जम्मू काश्मीर) असे बनावट परवाना घेऊन सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या आरोपीची नावे आहेत. वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 जुलै ते 27 जुलैदरम्यान रामटेकडी इंडस्ट्री इस्टेट परिसरात संतोष शुक्ला संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना दिसला. त्याच्याकडे चौकशी केली असता, एक गावठी कट्टा सापडला.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इतर साथीदारांकडही परवाने असलेले रायफल असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी तळेगाव येथील टोलनाक्यावर असलेल्या सुरक्षारक्षकाला ताब्यात घेतले, त्यांच्याकडे असलेला परवाना हा जम्मू काश्मीर येथील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याच्या सहीचा असल्याचे उघड झाले. एका पाठोपाठ सर्वांना अटक करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक विनय पाटकर, उपनिरीक्षक संतोष सोनवणे, अंमलदार हरिदास कदम, संतोष नाईक, अमजद पठाण, अतुल गायकवाड, यतीन भोसले, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमोले, विष्णू सुतार, नीलकंठ राठोड आणि सोनम भगत यांच्या पथकाने केली.
सूत्रधार जम्मू-काश्मीरमध्ये?
पोलिसांना शस्त्र परवान्याचा संशय आल्याने त्यांनी जम्मू-काश्मीरमधील राजोरी आणि अनंतनाग मॅजिस्ट्रेटकडे अहवाल मागवला होता. त्यांनी शस्त्र परवाने बनावट असल्याचा अहवाल दिला. बनावट शस्त्र परवाने देणारी टोळी कार्यरत असून, त्याचा मुख्य सूत्रधार जम्मू-काश्मीरमध्ये असल्याची शक्यता आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.