फडणवीस यांचा “वर्षा’तील मुक्‍काम कायम

तीन महिन्यांची वाढवली मुदत ः मंत्रालयातील दालनांचा ताबा सामान्य प्रशासनाकडे

मुंबई : निवडणूकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन करण्यात सर्व पक्ष असमर्थ ठरल्याने राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. परिणामी मंत्रालयातील दालनांचा ताबा सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. काही माजी मंत्र्यांनीही बंगले सोडण्याची तयारी सुरु केली असली तरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “वर्षा’ बंगल्यातच मुक्कामाला आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांनी 3 महिन्यांची मुदत वाढवून घेतल्याने सध्यातरी त्यांचा मुक्काम तेथेच आहे.

भाजपचे सरकार आता सत्तेवर येत नाही, असे चित्र निर्माण झाल्याने मुख्यमंत्री कार्यालयासह अन्य मंत्री कार्यालय आणि बंगल्यांवर सामानाची बांधाबांध सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे संयुक्त सरकार सत्तेवर येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, हे स्पष्ट होत असताना फडणवीस यांना “वर्षा’ हे सरकारी निवासस्थान सोडावे लागणार आहे.

फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मंत्रिमंडळ आपोआप बरखास्त झाले. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सामान्य प्रशासन विभागाने मंत्री कार्यालयातील साहित्य आणि मंत्री दालनांचा शासनाकडे ताबा देण्याचे आदेश काढले आहेत. या अनुषंगाने अनेक मंत्र्यांच्या कार्यालयातील संगणक, झेरॉक्‍स मशिन, टेलिफोन आणि साहित्य सामान्य प्रशासन विभागाकडे देण्यात आले आहे.

फडणवीस यांनी राजीनामा दिल्याने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात शुकशुकाट आहे. दुसरीकडे, “वर्षा’ या निवासस्थानी त्यांचा अजून काही दिवस तरी मुक्काम आहे. शासकीय नियमानुसार बंगला सोडण्यासाठी कोणत्याही मंत्र्याला 3 महिन्यांचा अवधी मिळतो.

Leave A Reply

Your email address will not be published.