अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सोडलेल्या शस्त्रांमुळे जगाला, भारताला किती धोका आहे? याबाबत विश्लेषण.
पळ काढणाऱ्या अमेरिकी/अफगाणी सैन्याने मागे सोडलेली यूएस एमव्हीसारखी 2 हजार चिलखती वाहने, यूएच-60 ब्लॅक हॉक, स्काउट ऍटॅक हेलिकॉप्टर्ससमवेत 208 लढाऊ विमाने, स्कॅन इगल मिलिट्री ड्रोन, 16 हजार नाइट व्हिजन गॉगल्ससारखी अन्य उपकरणे, 1 लाख 62 हजार कम्युनिकेशनशी संबंधित उपकरणे, एम-16 असॉल्ट रायफल, मोर्टार, हॉवित्झर तोफांसारखी 6 लाख इन्फंट्री शस्त्रांचा यात समावेश आहे.
गेली वीस वर्षे या शस्त्रांचा वापर झाल्यामुळे त्यांची किंमत कमी झाली आहे, आयुष्य कमी झाले आहे आणि क्षमतासुद्धा खूपच कमी झालेली आहे. एवढेच नव्हे तर मोठी शस्त्रे म्हणजे लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, रणगाडे, चिलखती वाहने यामध्ये वापरली जाणारी सॉफ्टवेअरना/ डिसेबल करण्यात आले आहे, त्यामुळे क्षमतासुद्धा खूपच कमी आहे.
90 टक्के शस्त्र अशी आहेत की जी पारंपरिक लढाई करता किंवा आकाशातून हल्ले करण्याकरता वापरण्यात येत होती. त्यांचा वापर करण्याकरता पुष्कळ कौशल्याची गरज आहे, जे तालिबानकडे नाही. आलेल्या बातम्यांप्रमाणे अनेक हेलिकॉप्टर आणि विमाने घेऊन अफगाणिस्तान सैन्याचे पायलट वेगवेगळ्या देशांत पळून गेले आहेत.त्यामुळे तालिबानी शस्त्रे वापरण्याची क्षमता ही पुष्कळच कमी झाली आहे.मात्र काही शस्त्रे दहशतवादी वापरू शकतात.
अफगाणिस्तानातील आतल्या शत्रूंच्या विरुद्धच या शस्त्रांचा वापर कसा होईल? पुढची अनेक महिने तालिबान्यांचे लक्ष अफगाणिस्तानमध्ये आपले राज्य मजबूत करण्याकडे असेल, कारण आजसुद्धा अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळ्या टोळ्यांचे वेगवेगळ्या भागांमध्ये राज्य आहे. उदाहरणार्थ, पाकिस्तान समर्थक हक्कानी गट तालिबानचे ऐकायला तयार नाही. पंजशीर खोऱ्यामध्ये अहमद मसूद तालिबानी विरोधकांना एकत्रित करून लढत आहे.
अमेरिकेकडून मिळालेली आधुनिक शस्त्रे अफगाणिस्तानचे दहशतवादी गट एकमेकांविरुद्ध वापरतील आणि आंतरराष्ट्रीय सीमांवरून होणारी घुसखोरी थांबवण्याकरता वापरली जातील. काही शस्त्रे (स्मॉल आर्म्स) ही दहशतवादी गटाकडून वापरली जाऊ शकतात. अनेक तालिबानी अमेरिकेचे अत्याधुनिक रायफल्स हातात घेऊन फिरत होते. परंतु या रायफल्सकरता लागणारा बारूद कुठे आहे? विविध प्रकारच्या चिलखती गाड्यांचे मेंटेनन्स फारच किमती आहे. ते करायची क्षमता तालिबान्यांची नाही. यासाठी पाकिस्तान किंवा चीनकडून मदत घेता येईल, परंतु चीन शस्त्रांचे मेन्टेनन्स करून पैसा कमवण्याचा प्रयत्न करेल.
शस्त्रे पाकिस्तानकडे जाऊ शकतात का?
अर्थातच ही शक्यता नक्कीच आहे. परंतु बहुतेक शस्त्रे ही पारंपरिक लढाई करता आहे आणि पाकिस्तानची भारताबरोबर पारंपरिक लढाई करण्याची हिंमत नाही. शस्त्रांचे आयुष्य कमी शिल्लक आहे आणि जर ही शस्त्रे पाकिस्तानकडे गेली तर त्यावरती अमेरिकेचे लक्ष असेल. त्यामुळे जर काही करायचे असेल तर त्यांना हे अतिशय लपून करावे लागेल. पण खर्च खूप लागेल आणि त्यातून काही निष्पन्न होण्याची क्षमता अगदीच कमी आहे. अमेरिकन सैन्याच्या रायफली आणि रात्रीच्या वेळेला बघण्याच्या दुर्बिणी पाकिस्तानी दहशतवादी भारताच्या विरोधात वापरू शकतात का? उत्तर आहे.
नक्कीच हे केले जाऊ शकते परंतु त्यांना लागणाऱ्या दारूगोळ्याचे काय आणि मेंटेनन्स कसे केले जाईल?दहशतवादी गट एके 47 रायफल्स वापरतात कारण त्यांना फारच कमी मेंटेनन्स लागतो आणि अतिथंड डोंगराळ भागातसुद्धा त्यांचा वापर चांगला करता येतो. हे अमेरिकन शस्त्रांच्या बाबतीत शक्य नाही. याशिवाय स्मॉल आर्म्स दहशतवाद्यांना कधीच कामी पडलेली नाहीत. त्यामुळे त्यांना सवय असलेली शस्त्रे एके 47 रायफल्स यापुढेही वापरली जाण्याची शक्यताच जास्त आहे.
अमेरिकन शस्त्रांचा वापर चीन रिव्हर्स इंजिनिअरिंग करून त्यांचे मॉडेल आणि डिझाइन हे चिनी सैन्याची क्षमता वाढवण्याकरता करू शकतो का? ही शक्यता नक्कीच आहे परंतु सध्या चिनी शस्त्रे ही जास्तकरून रशियन बनावटीची आहे, जर आता अमेरिकन डिझाइन कॉपी करायला सुरुवात केली तर खर्च वाढू शकतो.
या वेगवेगळ्या कारणांमुळे शस्त्रांचा गैरवापर भारता विरुद्ध केले जाण्याची शक्यता कमीच आहे. तालिबानी दहशतवादी भारतात येण्याची शक्यता पुढील काळामध्ये आहे. परंतु एलओसी वरती भारतीय सैन्याची तैनाती जबरदस्त आहे आणि त्यामधून आत घुसणे अतिशय कठीण आहे. याशिवाय जी थोडीफार घुसखोरी होते त्यांना दहशतवादी विरोधी अभियान करून काश्मीर खोऱ्यामध्ये मारले जाते.
अफगाणी तालिबानी याआधी पण काश्मीरमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी काश्मीरच्या लोकांवरती, महिलांवर केलेल्या अत्याचारामुळे त्यांच्या विरुद्ध आम जनतेमध्ये पुष्कळ राग आहे. त्यामुळे दहशतवाद वाढवण्याकरता तालिबान्यांचा वापर शक्य असला तरी, त्यामध्ये त्यांना फारसे यश मिळणार नाही. कारण भारतीय सैन्याची त्यांना मारण्याची क्षमता लक्षणीय आहे. अफगाणिस्तानात वेगवेगळे गट आपली ताकद वाढवण्याकरता शस्त्रे चोरायचा प्रयत्न करतील. कारण अफगाणिस्तानमध्ये देशापेक्षा जाती-जमाती आणि टोळ्या या जास्त महत्त्वाच्या असतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेची मागे सोडलेली महागडी शस्त्रे ही पांढरा हत्ती म्हणून बनण्याची शक्यता जास्त आहे.