पुणे – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या “एमएचटी-सीईटी’चा निकाल दि. 12 जूनच्या आसपास जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे बारावी निकालानंतर सीईटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दि. 9 ते 21 मे या कालावधीत पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपची सीईटी झाली. या सीईटीसाठी यंदा सहा लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पीसीएम ग्रुपसाठी तीन लाख 33 हजार 41 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख 13 हजार 732 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 19 हजार 302 विद्यार्थी अनुपस्थित होते. पीसीबी ग्रुपसाठी तीन लाख 3 हजार 48 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी दोन लाख 77 हजार 403 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 25 हजार 645 विद्यार्थी अनुपस्थित होते. पीसीएम ग्रुपपेक्षा पीसीबी ग्रुपच्या परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थ्यांची गैरहजेरी जास्त होती. एकूण 44 हजार 954 विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटी दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी या पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रत्यक्ष प्रवेश फेरीचे वेळापत्रक सीईटीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच जाहीर केले जाणार असल्याचे राज्य सीईटीकडून सांगण्यात आले आहे.