रुपगंध : फळांची गाणी

मी आज घरात एकटीच होती. तेवढ्यात शमीच्या मैत्रिणींचा घोळका दारात उभा. शमी मुलींना पाहून हरखली. आई म्हणाली, “या गं या. अगदी नेमक्या वेळी आलात तुम्ही.’
शमीची मैत्रीण राधिका म्हणाली, “शमीच्या डोक्यात भन्नाट आयडिया असतात नव्या नव्या खेळाच्या. मग आम्ही सर्वांनीच ठरवलं की आज शमूकडे खेळायला जाऊया. ठरल्याबरोबर आलो इथे आम्ही साऱ्याचजणी.
आई पिठाची पिशवी घेऊन स्वयंपाक खोलीत निघून गेली आणि थोड्याच वेळात बाहेर आली द्राक्षांचे भलेमोठ्ठे दोन तीन घड घेऊन. मुलींना म्हणाली, “धुऊन आणलेत ही द्राक्षं. खेळता खेळता एक एक तोंडात टाका. म्हणजे खेळ रसदार होईल. पण खेळता खेळता भांडू नका हा. या द्राक्षांवरून मला एक गंमत आठवली. ती पटकन सांगते आणि मग मी माझ्या कामाला आत जाते.
मुलींनो, तुम्हाला माहीत आहे का ह्या द्राक्षांचे घड विकत घ्यायला महाग, पण त्यामानाने घडापासून सुटलेली द्राक्षे विकत घ्यायला स्वस्त असतात. याचं कारण माहितीय तुम्हाला? अरे, या सुट्या सुट्या द्राक्षांपेक्षा एकत्र घडात असलेल्या द्राक्षांना महत्त्व जास्त. एकतेचा हाच तर महत्त्वाचा मंत्र आहे, एकीचे बळ मिळते फळ, म्हणतात ते काय खोटं नाही. सुटे सुटे, एकटे एकटे राहण्यात काय मजा.
एकीने राहण्यातच आहे खरी मजा.’ शमी म्हणाली, “आई भारीच हा. आम्ही साऱ्याजणी या द्राक्षाच्या घडासारख्याच एकत्र राहू. एकत्र खेळू. बरं चला काय खेळूया बरं. मला एक नवा खेळ सुचलाय या द्राक्षावरून. आपण ना आज एक एक फळ होऊया… मग त्या फळाची कहाणी गाण्यातून सांगूया. मी द्राक्ष होते. माझं गाणं सुरू करते हा. वेलीवर मी, लोंबकळत राही मनुका, किसमिस, माझ्यापासून होई नाशिकचे मी आहे, सुप्रसिद्ध फळ साऱ्यांच्या आरोग्याला, देते मी बळ शमीचे गोडमगोड द्राक्षबोल ऐकून मुलींना टाळ्या वाजवल्या. राधिका द्राक्षे खात खातच म्हणाली, “ये ये, माझा नंबर आता. मी संत्री होते हा…
लिंबाचाच मी एक, प्रकार आहे बरं नारंगीही मला, म्हणतात खरं नागपूरची आहे मी, मला नाही तोड स्वादाने आहे मी, छान आंबट गोड
मस्त मस्त. तोंडाला पाणी सुटलं… शमी आनंदून म्हणाली. आता बराच वेळ गप्प असणाऱ्या भामाची कळी खुलली. द्राक्ष तोंडात टाकत ती म्हणाली, ये आता मी हा. मला ना कोकणातला ढेरपोट्या फणस खूप आवडतो म्हणून मी फणसच होणार.
काटेरी अंग जरी आतून मी गोड बरका असो, कापा असो, मला नाही तोड पोटात माझ्या, खूप खूप गरे गरे खाऊन सांगा, कसे लागले बरे? छान लागले, छान लागले… सगळ्यांनी एकच गलका केला. माधुरी सगळ्यांना थांबवत म्हणाली. ये आता माझी पाळी हा. मी वसईची, मग माझे आवडते फळ केळी, हे तुम्हाला कळलेच असेल. शरीराला धष्टपुष्ट, करते मी खरं सालीपासून माझ्या, जपा तेवढं बरं वसईची, जळगावची, केळी आम्ही मस्त काहीजण एक डझन, करून टाकी फस्त ये माझे गावचे काका ना, खरंच एकावेळी एक डझन केळी खातात. तब्बेतीने तर ते खूपच मजबूत आहेत… भाग्यश्रीने पुष्टी जोडली.
ये आता माझा नंबर हा. मी बाई कलिंगड होते. मला जाम आवडतो कलिंगडाची ज्यूस… लता म्हणाली. उन्हाळ्यात हमखास, मी भेटीला येते खाईल त्याला मी, गारेगार थंडावा देते वरुन रंग हिरवा, मी लालेलाल आत टरबूज, खरबूजापेक्षा, माझी न्यारीच बात होय गं होय. कलिंगडाची बातच न्यारी… शमीने दुजोरा दिला. भावना म्हणाली, आता माझी पाळी. मी होणार सर्व फळांचा राजा आंबा… कच्च्याची लागते, आंबट फोड पिकल्यावर होतो, मधुर गोड गोडगोड रस पिऊन, मगच बोला फळांचा राजा, म्हणतात मला साक्षी म्हणाली, मस्त गोडमगोड आंबा. अय्या ताटातले दाक्षे सारे आपण संपवले की. खेळाच्या नादात लक्षातच आलं नाही.
बरं चला, आता माझा नंबर हा. मी होते पपई… एरंडाच्या पानांसारखी, माझी पानं असतात मिऱ्यासारख्या काळ्या बिया, आत खूप बसतात
पिवळ्याधमक रंगात, मी साऱ्यांना दिसते पिकल्यावर साखरेसारखी, मी गोड हासते होय होय, अशीच साखरेसारखी गोड हसत राहा… आई बाहेर येत म्हणाली. आईच्या हातात ताट आणि ताटात सगळ्यांसाठी चक्क बेसनाचे लाडू. आईने प्रत्येकाच्या हातावर एक एक लाडू ठेवला.
एकनाथ आव्हाड





