पुणे – रेशन दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नवीन ई-पॉस मशिन फोर-जी व आयरिस स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आधारकार्ड वरील फिंगरप्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार पडताळणी करताना अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची आधार पडताळणी कशी करावी हा मोठा प्रश्न यानिमित्ताने मार्गी लागला आहे.
शिधापत्रिकेमध्ये आधार संलग्न पात्र असलेली पण फिंगरप्रिंट देता येत नसलेल्या व्यक्तींना “आयआरआयएस’ स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे आता आधार संलग्न हाताचे ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्यांचे स्कॅन केले जाणार आहे. या प्रक्रियेमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे.
याबाबतचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. लाभार्थ्यांची ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूचे वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रास्तभाव दुकानांमध्ये 2जी/3जी ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या होत्या. आता 4-जी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
संपूर्ण व्यवस्थेचे संगणकीकरण
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार, गैरव्यवहार थांबविण्यासाठी, लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले आहे.