- “डॅशबोर्ड’ची दमछाक; आकडे जुळविताना प्रशासनाच्या नाकीनऊ
पिंपरी – करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये सूसूत्रता येण्यासाठी प्रशासनाच्या वतीने डॅशबोर्डची संकल्पना सुरू करण्यात आली आहे. मात्र पहिल्यापासूनच डॅशबोर्ड आणि प्रसिद्धीपत्रक यामध्ये मोठी तफावत आहे. रुग्णसंख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असल्यापासून प्रशासन आणि डॅशबोर्डचे आकडे कधीच जुळले नाहीत. कधी डॅशबोर्डला संख्या कमी तर प्रसिद्धीपत्रकात जास्त तर कधी डॅशबोर्डला जास्त आणि प्रसिद्धीपत्रकात कमी असा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. मात्र याबाबत प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये 11 मार्च रोजी करोनाचे पहिले तीन रुग्ण आढळले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने संकेतस्थळावर करोनाबाधित रुग्णांची माहिती देण्यासाठी डॅशबोर्ड सुरू केला. त्यामध्ये दररोज किती रुग्ण, किती मृत्यू, स्त्री-पुरुष प्रमाण, रुग्णांची लक्षणे याची माहिती देण्यात येते. शहरामध्ये मे महिन्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. तेव्हापासून प्रशासनाने आकडेवारीमध्ये सातत्याने तफावत केली आहे. 7 जुलै रोजी प्रसिद्धीपत्रकानुसार शहरामध्ये 300 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. मात्र डॅशबोर्डवर तब्बल 399 रुग्णांची नोंद होती. तर 30 जुलै या दिवसापर्यंत डॅशबोर्डवर 22309 रुग्णांची नोंद झाली होती. मात्र प्रशासनाने त्यादिवसापर्यंत प्रसिद्धीपत्रकाद्वारे 20317 रुग्णांचीच माहिती दिली होती. म्हणजेच तब्बल 1992 रुग्णांची तफावत होती.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून कमी रुग्ण दाखविण्याचा प्रताप केला. त्यावेळी डॅशबोर्डवर जास्त रुग्णसंख्या दिसत होती. तर गेल्या पंधरा दिवसांपासून डॅशबोर्डचे आकडे मागे पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी 28 तारखेला प्रसिद्धीपत्रकानुसार 1048 रुग्ण होते. तर डॅशबोर्डवर फक्त 694 रुग्णांची नोंद झाली होती. 20 ऑगस्टला प्रशासनाने 1240 रुग्णांची माहिती दिली. तर डॅशबोर्डवर फक्त 448 रुग्णांची नोंद झाली होती. तर मृतांच्या आकडेवारीमध्येही सातत्याने गोंधळच असल्याचे समोर आले आहे. बेजबाबदार आणि गांभिर्य नसलेल्या लोकांच्या हाती डॅशबोर्ड गेल्यामुळे हा प्रकार सुरू असल्याचा आरोप होत आहे.
मुख्य उद्देशालाच हरताळ
करोनाबाधित रुग्णांची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या वतीने वॉररुमची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी आयटी इंजिनियर यांच्यासह काही डॉक्टरांची फौज तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्चही केला जात आहे. वॉररुमच्या माध्यमातून करोनाबाधित रुग्णांची अद्यावत माहिती मिळावी. तसेच रुग्णांना मदत व्हावी, हा यापाठीमागचा उद्देश असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र हे वॉररुमच अपडेट नसल्याने मुख्य उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.
जबाबादारीचे भान नाही
एप्रिल महिन्यापासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये गोंधळ आहे. वॉररुमधून अपडेट केली जाणारी माहिती अपूर्ण असते. डॅशबोर्डवरची माहितीही अद्यावत केली जात नाही. खासगी रुग्णालयांतील बेडबाबत माहिती अद्यावत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते रुग्णालय बेडची माहिती अद्ययावत करत नाहीत. अनेक रुग्णालयांनी एक महिन्यांपासून बेडची माहिती अपडेट केलेली नाही. असे असताना प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत शांत बसले आहे. यावरून प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.