नवी दिल्ली – लॉरेन्स बिष्णोई गॅंगचा प्रमुख साथीदार विक्रमजीत सिंग ब्रार याला संयुक्त अरब अमिरातीकडून भारतात आणण्यात आले आहे. त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने त्याला अटक केली आहे. “एनआयए’च्यावतीने आज ही माहिती देण्यात आली आहे.
पंजाबमधील प्रसिद्ध गायक शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणात ब्रार याचा प्रमुख सहभाग होता. विक्रमजीत सिंग ब्रार याचे “युएई’कडून भारताकडे प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी “एनआयए’चे पथक “युएई’ला गेले होते.
शस्त्रांची तस्करी आणि भारतातील खंडणीसारख्या अनेक गुन्हेयांमध्ये कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिष्णोईसह त्याचा सहभाग होता. गोल्डी ब्रार आणि इतरांनी मिळून निरपराध व्यक्ती आणि उद्योगपतींची हत्या केली होती. त्यानंतर ब्रार 2020 मध्ये पळून गेला.
ब्रार हा भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीच्या 11 गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता. त्याच्याविरोधात आतापर्यंत 11 वेळा लुकआउट नोटीस बजावण्यात आली होती.
त्यासाठी पंजाब, परियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या पोलिसांनी मागणी केली होती. ब्रार “युएई’मधून लॉरेन्स बिष्णोई गॅंगची सूत्रे हालवत होता. बिश्णोई आणि गोल्डी ब्रारसाठी तो खंडण्यांच्या धमक्या देत असायचा. त्याच्याविरोधात “एनआयए’च्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.