पिंपरी, दि. 4 – पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरातील म्हाडाने काढलेल्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत 20 दिवसांनी वाढवून 25 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करताना निर्माण झालेला संभ्रम, अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती म्हाडाकडून कळविण्यात आली आहे.
या सोडतीसाठी आत्तापर्यंत 28 हजार 720 अर्ज आले आहेत. त्यापैकी 16 हजार 892 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरातील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत 5,990 सदनिका विक्रीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. मात्र, सुरुवातीला रहिवासी दाखल्याबाबत झालेला संभ्रम, त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये आलेल्या उडचणींमुळे या प्रक्रियेत अनेक इच्छुकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत 5 फेब्रुवारी होती. आता ती 25 फेब्रुवारी करण्यात आली आहे.
7 मार्चला सोडत
म्हाडाच्या घरासाठी 25 फेब्रुवारी रोजी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. 26 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ऑनलाइन अनामत रक्कम स्वीकारण्यासाठी 27 तर बॅंकेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे रक्कम भरण्यासाठी 28 फेब्रुवारीची मुदत असेल. प्रारूप यादी 3 मार्चला, तर अंतिम यादी 5 मार्चला तर 7 मार्चला सोडत जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून कळविण्यात आली आहे.