पुणे – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय चर्चेत आहे. याबाबतची फाइल राजभवनकडे यापूर्वीच पाठवल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजभवन कार्यालयाने मंगळवारी स्पष्टीकरण दिले. “एमपीएससी’ सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात शिफारस असलेली फाइल सोमवार (दि.2) दुपारनंतर प्राप्त झाली असून, ती राज्यपालांच्या विचारधीन असल्याचे राजभवन कार्यालयाकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.
“एमपीएससी’च्या रिक्त असलेल्या सदस्यांची नियुक्ती झाल्याशिवाय स्पर्धा परीक्षांच्या कामास गती मिळणार नाही. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दि. 28 जुलै रोजी या जागा त्वरित भरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतर काहीच निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने “एमपीएससी’च्या तीन सदस्यांच्या नियुक्तीचा विषय अंतिम निर्णयासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. हा विषय राज्यपाल लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून व्यक्त केली जात आहे.
आता या विषयावर राज्यपालांनी स्पष्टीकरण दिले आहे. एमपीएससी सदस्य नियुक्तीची फाईल अगोदरच राजभवन येथे पाठविली आहे, अशा आशयाच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. याबाबतची फाइल दि. 2 ऑगस्ट रोजी दुपारनंतर राजभवन येथे प्राप्त झाली असून ती आता विचाराधीन असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे.