तळेगाव दाभाडे – येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर जलवाहिनीसाठी जिजामाता चौक ते लिंब फाटा रस्त्यावर खोदकाम केलेल्या जागी रस्ता खचला आहे. जिजामाता चौक व मारुती मंदिर चौकात रस्ता खड्डेमय झाला. रस्ता चुकविताना दैनंदिन अपघात होऊन दुचाकीस्वार किरकोळ व गंभीर जखमी होत आहेत. वाहने खड्ड्यात आदळून वाहने नादुरुस्त होत आहेत. या रस्त्यातील खड्डे त्वरित दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील कायमच वर्दळीचा असलेला जिजामाता चौक मारुती मंदिर चौक ते लिंब फाटा रस्ता. या रस्त्यावर मोठमोठ्या आकाराचे खड्डे पडले असून, त्या खड्ड्यात पाणी साचले आहेत. तसेच नगरपरिषदेने जलवाहिनीसाठी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर रस्त्यावर खोदकाम केले आहे. त्याठिकाणी रस्ता मोठ्या प्रमाणात खचला असून वाहने आदळून नादुरुस्त तर होत आहेतच अपघातात दुचाकीस्वार किरकोळ व गंभीर जखमी होत आहेत. या रस्त्यातील खड्डे चुकविताना अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून वाहने धडकून अपघात होत आहेत.
वाहतूक नियम मोडल्यावर दंड हजारात केले असून, त्याबरोबर रस्ते सुरक्षित करण्याची मागणी होत आहे. या खड्ड्यात साचलेले पाणी पादचारी व विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना रस्त्याच्या खड्ड्यांकडे लक्ष दिले जात नाही. नागरिक वारंवार नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाला खड्डे दुरुस्ती बाबत मागणी करत आहेत. खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. तळेगाव दाभाडे शहरातील खड्डेमय रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नगरसेवक गणेश काकडे, अरूण माने, सोमा भेगडे, आशिष खांडगे, सुरेश शिंदे, निलेश गराडे, मिलिंद अच्युत आदींनी केली.