पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकांसाठी प्रश्नसंच तयार करण्यात येत आहे. असे असताना अंतिम वर्ष मराठीच्या एका पेपरमधील प्रश्नसंचामधील काही प्रश्न व्हॉट्स ऍपवर व्हायरल झाल्याचे उघड झाले.
त्यानंतर व्हॉट्स ऍपद्वारे व्हायरल झालेले प्रश्नसंचातील प्रश्न वगळण्यात येणार आहे. एकूणच ऑनलाइन परीक्षा होत असताना प्रश्नसंचच्या गोपनियतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
करोना पार्श्वभूमीवर यंदा अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत आहे. जवळपास 85 टक्के विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देणार आहेत.
ही परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असल्याने त्यासाठी प्रश्नसंच संबंधित विषयाच्या अभ्यास मंडळाकडून तयार करण्यात येत आहे. अजून प्रश्नसंच प्राथमिक टप्प्यात असतानाही त्यातील काही प्रश्न व्हॉट्स ऍपद्वारे बाहेर येणे ही गंभीर बाब आहे. प्रश्नसंच अंतिम झाल्यानंतर त्यात गोपनियता कायम राहील का? याविषयी सांशकता व्यक्त होत आहे.