मतदानावेळी अश्विनी जगताप भावूक
पिंपरी, दि. 26 – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी परिवारातील सदस्यांसमवेत पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला. तसेच दरवेळी साहेबांना मतदान करायचे, यावेळी स्वतःला मतदान केले, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात साडेतीन तर सकाळी अकरा वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाले. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्याबरोबर भाजप नेते शंकर जगताप, मुलगी ऐश्वर्या रेणुसे यांच्यासह घरातील इतर सदस्य उपस्थित होते.
अश्विनी जगताप यांनी मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधला. दरवेळी साहेबांना मतदान करायचे, यावेळी स्वतःला मतदान केले. त्यावेळी मनाला थोडेसे वेगळे वाटले. दरवेळी साहेब असायचे, मी त्यांना मतदान करायचे. पण आज स्वतःला मत देतेय, या भावनेने मनाला हुरहुर वाटली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.