शिरूर (पुणे) -सगळीकडे कांद्याचे बाजारभाव पडलेले असताना शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लिलावात सरासरी 2000, 2500 ते 3025 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
या लिलावाच्या वेळी स्वतः सभापती शंकर जांभळकर, संचालक बंडु जाधव, प्रवीण चोरडिया, विजय गद्रे, सचिव अनिल ढोकले लक्ष ठेवून होते. शिरूर बाजार समितीचया नवीन मार्केटयार्डवर भरत असणाऱ्या कांदा मार्केट मध्ये कांद्याची दररोज मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. आठवड्याचे दर बुधवार, शुक्रवार व रविवारी कांद्याची जाहीर लिलावाने विक्री होत असते. शुक्रवारी (दि. 18) सुमारे 5640 पिशव्याची आवक झाली. चांगल्या कांद्यास सुमारे 2500 ते 3025 प्रती क्विंटल याप्रमाणे दर मिळाले.
कांदा हे पिक शेतकऱ्यांचे नगदी पिक असुन शिरूर यार्डवर शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, खेड, दौंड, जुन्नर तालुक्यातुन जवळचे मार्केट असल्यामुळे आवक होत आहे. बाजार समितीने यार्डवर शेतकऱ्यांचा कांदा उतरविणेसाठी शेड, लाईट, स्वच्छतागृह, सी. सी. टी. व्ही. इत्यादी आवश्यक त्या पायाभुत सुविधा उभारलेल्या आहेत. पुणे व शेजारील अहमदनगर, नाशिक जिल्ह्यामध्ये गरवा जातीचा डबल पत्ती असणाऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. हा कांदा टिकाऊ असुन त्यास चांगली मागणी असते. यार्डवरील कांदा कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामीळनाडु, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम इत्यादी राज्यामध्ये विक्रीसाठी जात असतो. यार्डवर कांदा विक्रीचे दर हे शेजारील मार्केटपेक्षा जास्तच निघत असल्याचे सचिव अनिल ढोकले यांनी सांगीतले.