-->

युरोपिय संघाकडून म्यानमार, रशियावर निर्बंधांचे इशारे

ब्रुसेल्स – म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या बंडाची दखल घेऊन युरोपिय संघाने निर्बंध घालण्याचा इशारा दिला आहे. रशियात विरोधी नेते ऍलेक्‍सी नवालनी यांना झालेली अटक आणि सुनावण्यात आलेली शिक्षा या पार्श्‍वभुमीवर सुरू असलेल्या आंदोलनाचीही दखल युरोपिय संघाने घेतली आहे. रशियालाही युरोपिय संघाने निर्बंधांचा इशारा दिला आहे. युरोपिय संघाच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत या दोन्ही देशांमधील आंदोलनांबाबत तीव्र चिंता व्यक्‍त करण्यात आली. युरोपिय संघातील 27 सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे देखील उपस्थित होते.

या बैठकीनंतर लगेचच युरोपिय संघाच्यावतीने म्यानमारबाबत एक निवेदन प्रसिद्धीस दिले. म्यानमारमधील लष्करी बंडाला जबाबदार असणाऱ्या व्यक्‍ती आणि त्यांच्या आर्थिक हितसंबंधांवर प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्यास युरोपिय संघ तयार आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.

म्यानमारमधील लष्कराने 1 जानेवारीला केलेल्या बंडामुळे निर्माण झालेली तणावाची स्थिती ताबडतोब पूर्ववत व्हायला हवी आणि उलथवून टाकलेले नागरी सरकार पूर्ववत करण्याची मागणी केली. निर्बंध टाळण्यासाठी म्यानमारला दिली गेलेली ही अखेरची संधी असणार आहे. त्याचबरोबर रशियातील विरोधी नेते ऍलेक्‍सी नवालनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना झालेली अटक आणि त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही निर्बंध घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. रशियातील संबंधित अधिकाऱ्यांची मालमत्ता गोठवली जावी आणि व्हिसा बंदी सारखे निर्बंध घातले जाण्याची शक्‍यता असल्याचे युरोपिय संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या सूत्रांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.