50 एमएलडी पाण्यासाठी आता नोव्हेंबरची तारीख
आंद्र धरणाच्या पाण्यासाठी “तारीख पे तारीख’
पिंपरी – गेल्या अनेक दिवसांपासून अतिरिक्त पाण्यासाठी नवनवीन तारखा देणाऱ्या महापालिका प्रशासनाने आता आणखी एक नवी तारीख दिली आहे. केवळ कामाच्या प्रगतीचा आढावा आणि पाहणी दौरे करुन तारखा देणाऱ्या प्रशासनावर जनता आता पुरती वैतागली असून बस्स झाली पब्लिसिटी आता लवकर पाणी द्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
आंद्र धरणातून पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून नुसत्याच तारखा दिल्या जात आहेत. राजकीय दबाव वाढल्यानंतर राजकीय नेते मंडळींना घेऊन प्रशासन पाहणी दौरा किंवा बैठक घेत आणि आणखी एक नवीन तारीख देते. आता पुन्हा एकदा प्रशासनाने आमदार-खासदारांना घेऊन पाहणी दौरा आयोजित केला. येत्या 20 दिवसांत निघोजेतून पहिल्या टप्प्यात 50 एमएलडी पाणी उचलले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
हे पाणी नोव्हेंबरमध्ये येईल आणि समाविष्ट गावाला पाणीपुरवठा केला जाईल. या भागाचे अतिरिक्तचे पाणी चिंचवडमधील वाकड, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, रावेत या गृहनिर्माण सोसायट्या असलेल्या भागाला दिले जाईल. त्यामुळे शहरातील पाणी समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास राजकीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या पाहणी दौऱ्यात खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी सोमवार (दि.17) रोजी चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता देवांन्ना गट्टुवार, गोंडवाना इंजिनिअर्स लिमिटेड ठेकेदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चिखलीत आठ हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र
पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्णत्वाकडे आहे. दोन लाईन जोडायच्या राहिल्या आहेत. त्याचे काम आठ दिवसात होईल. येत्या 15 दिवसात पाणी सोडण्याची चाचणी होईल. आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम पूर्ण झाले आहे.