“जुळून येती रेशीम’गाठी या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणजेच एक हसरं आणि सुंदर व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. “जुळून येती रेशीमगाठी’मधील साधीसुधी प्राजक्ता आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या “हम्पी’ चित्रपटातील बोल्ड अँड बिनधास्त प्राजक्ताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांसोबतही ती आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या भाचे मंडळींसोबत झोपाळ्यावर झुलताना दिसून येते. “भटकंती’ ” सुट्टी’ हे हॅशटॅग वापरून तिने आपल्या सहलीतील हा व्हिडिओ आपल्या चाहत्यांशी शेअर केला आहे.
मागचे दोन-तीन महिने करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बरेच जण घरीच आहेत. सर्वांनाच आता बाहेर फिरायला जाण्याचे वेध लागलेले आहेत. मग आपले सेलिब्रिटीही यात का मागे राहतील ना? प्राजक्ता माळीदेखील आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्या सुट्ट्यांचा आस्वाद घेत आहे.
“पाऊस, वातावरण, जेवण, भाच्यांचा सहवास, सगळं कसं छान छान छान छान हे’ असे कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे. मूळची पंढरपूरचे असलेली प्राजक्ता कामानिमित्त मुंबईतच राहते. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास “लॉकडाऊन’ आणि “वाय’ हे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.