पाचगणी -महाबळेश्वरच्या वेण्णालेक नौकाविहार समोर वनविभागाच्या फॉ. कं. नंबर 77 या मालकी जागेवर असलेल्या 21 खाद्यपदार्थांच्या व इतर स्टॉलचे अतिक्रमण वनविभागाने हटवले. ही मोहीम बुधवारी सकाळी सुरु करण्यात आली. लिंगमळा येथील स्वाद रेस्टॉरंटवर देखील कारवाई करण्यात आली.
गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बैठक घेऊन महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागासह पालिका प्रशासनास अतिक्रमणे हटविण्याबाबतच्या सक्त सुचना दिल्या होत्या. तसेच वनविभागाच्या वतीने या स्टॉलधारकांना पंधरा दिवसापूर्वी ही अतिक्रमणे हटविण्याबाबतच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या. वेण्णालेक परिसरात वनविभागाचा छत्रपती प्रतापसिंह वन उद्यानासमोर वनविभागाच्या हद्दीत परवानाधारक 28 स्टॉलधारक आहेत तर वेण्णालेक बोट क्लब समोर 21 व त्याहून अधिक अतिक्रमण करून विनापरवाना लावण्यात आलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. दरवर्षी या स्टॉल्समध्ये वाढ होतच होती. मात्र हे हातगाडीधारक स्थानिक असल्याने वनविभागास अडचणी येत होत्या. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने देखील हे अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. तर उच्चस्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकांमध्ये देखील हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात वनविभागास विचारणा होत होती. यापूर्वी दोन तीन वेळा हे स्टॉल बंद देखील करण्यात आले होते. पण, ठोस कारवाई करताना अडचणी येत होत्या.
याच प्रकरणावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देवून महाबळेश्वर- पांचगणी राज्यमार्गावर रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस दहा मीटर अंतरावर असलेले अनाधिकृत- विनापरवानगी करण्यात आलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आणि या मोहिमेला गती मिळाली. वनविभागाने पंधरा दिवसापूर्वी वेण्णालेक नौकाविहार समोर वनविभागाच्या फॉ कं.नंबर 77 या मालकी जागेवर असलेल्या 21 खाद्यपदार्थां व इतर स्टॉल्सचे अतिक्रमण त्वरित हटविण्याबाबतच्या नोटीसा देत ही अतिक्रमणे स्व खर्चाने हटवावीत अन्यथा शासनांच्यावतीने हटविण्यात येतील व लागणारा खर्च वसूल करण्यात येईल असा इशारा दिला होता.
त्यानुसार बुधवारी सकाळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा वेण्णालेक परिसरात तैनात करण्यात आला होता. जेसीबीसह ट्रॅक्टरच्या साहाय्याने सकाळी आठ वाजता या अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात झाली. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या कारवाईनंतर वनविभागाने लिंगमळा येथील एका रेस्टॉरंटवर सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या नेतृत्वाखाली देखील धडक कारवाई केली. यावेळी महाबळेश्वचे वनक्षेत्रपालही उपस्थित होते.