पुणे -मिळकतकराचे उत्पन्न वाढविण्यासह प्रामाणिक करदात्यांना भेट म्हणून महापालिका या वर्षीपासून लकी ड्रॉ काढणार आहे. त्यात दि.15 मे ते 31 जुलै या कालावधीत कर भरणाऱ्यांना तब्बल 5 कार, 15 ई-बाइक आणि मोबाइल यांसह 10 लॅपटॉप बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. या लकी ड्रॉमध्ये निवासी, बिगर निवासी तसेच रिकाम्या जागा असलेल्या मिळकतधारकांना समाविष्ट केले जाणार आहे. ऑगस्टमध्ये हा लकी ड्रॉ काढला जाणार आहे.
महापालिकेकडे नोंदणी असलेल्या सुमारे साडेबारा लाख मिळकतींपैकी सुमारे आठ लाख मिळकतकतधारकच नियमित कर भरतात. महापालिकेच्या मिळकतकराचे उत्पन्न मागील वर्षी सुमारे 2 हजार कोटींवर गेले आहे. त्याचवेळी थकबाकीही दहा हजार कोटींच्या घरात आहे. त्यामुळे मिळकतकर उत्पन्न वाढविण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करत आहे. दरम्यान, नियमित कर भरणाऱ्यांसाठी आयुक्तांनी 2022-23 च्या अंदाजपत्रकात बक्षीस योजना जाहीर केली होती. या योजनेचे स्वरूप अखेर जाहीर करण्यात आले. याद्वारे जवळपास 40 मिळकतधारकांना कोटीभर रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. मात्र, 31 जुलैपूर्वी कर भरलेले नागरिकच योजनेसाठी पात्र असतील.
कर रक्कम (रुपयांत) आणि बक्षीस
1 लाखांपुढे : 1 कार, 3 ई-बाइक, 3 मोबाइल, 2 लॅपटॉप
50 हजार ते 1 लाख – 1 कार, 3 ई-बाइक, 3 मोबाइल, 2 लॅपटॉप
25 हजार ते 50 हजार- 1 कार, 3 ई-बाइक, 3 मोबाइल, 2 लॅपटॉप
25 हजार किंवा त्यापेक्षा कमी – 2 कार, 6 ई-बाइक, 6 मोबाइल,
4 लॅपटॉप
प्रोत्साहन योजना
मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा सर्वाधिक मोठा स्रोत आहे. आधी जकात आणि एलबीटी बंद केल्यानंतर महापालिकेस या उत्पन्नाची प्रतिपूर्ती म्हणून शासनाकडून एक निश्चित उत्पन्न दिले जाते. पण, त्यासाठी शासनाच्या निर्णयावर अवलंबून राहावे लागते. परिणामी, महापालिकेने मिळकतकर वसुली वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अशा प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहेत.