मुंबई – करोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये 26 हजार 93 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आले, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी 2020मध्ये राज्यात 1 लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबरअखेर 1 लाख 73 हजार 974 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मलिक यांनी सांगितले.
माहे नोव्हेंबर 2021 मध्ये विभागाकडे 46 हजार 283 इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 12 हजार 577, नाशिक विभागात 5 हजार, पुणे विभागात सर्वाधिक 18 हजार 097, औरंगाबाद विभागात 5 हजार 811, अमरावती विभागात 1 हजार 686 तर नागपूर विभागात 3 हजार 109 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. माहे नोव्हेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 26 हजार 093 उमेदवार नोकरीस लागले.