मुंबई – अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. या क्षेत्रात विकास करण्यासाठी मोठी संधी असून या क्षेत्रात ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योगस्नेही धोरणावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या सिंगल विंडो पोर्टलचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महाऊर्जाचे महासंचालक रविंद्र जगताप, महानिर्मितीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अन्बलगन उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत आहे. गुंतवणूकदार व विकासकांना उद्योग उभारण्यासाठी “इज ऑफ डुईंग’ अत्यंत महत्त्वपूर्ण असते. त्यादृष्टीने “महाऊर्जा’ने विकसित केलेले सिंगल विंडो पोर्टल गुंतवणूकदार व विकासकांसाठी खूप उपयोगी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता अपारंपरिक ऊर्जा निर्मिती आणि वापराला अधिक चालना देणे गरजेचे झाले आहे. त्यादृष्टीने या क्षेत्रात गुंतवणूकदार व विकासकांना साह्यभूत ठरेल असे सिंगल विंडो पोर्टल तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.