नवी दिल्ली – दुबईवरून अमृतसरला (Dubai to amritsar) जाणारे एअर इंडियाच्या (Air India) विमानाचे काल कराचीमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले. विमानातील एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे विमान कराचीच्या विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे विमान दुबईवरून (Dubai flight) सकाळी 8.50 वाजता निघाले होते. मात्र दुपारी 12.30 वाजता ते कराचीमध्ये उतरवले गेले. कराचीचा विमानतळ हा सर्वात जवळचा विमानतळ होता. त्यामुळे विमान तेथेच उतरवण्याचा निर्णय विमानातील कर्मचाऱ्यांनी घेतला, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
वैमानिकाने आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने कराचीच्या विमानतळाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय करून विमान तेथे उतरवण्याची तयारी केली होती. कराची विमानतळावरील डॉक्टरांनी आवश्यक औषधे दिली आणि वैद्यकीय तपासणीनंतर संबंधित प्रवाशाला विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने उड्डाण करण्यास परवानगी दिली.
त्यानंतर एअर इंडियाचे विमान अमृतसरकडे निघाले आणि दुपारी 2.30 वाजता सुखरुप अमृतसरला उतरले, असेही या प्रवक्त्याने सांगितले. कराची विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या या सहकाऱ्याबद्दल एअर इंडियाच्या प्रवक्त्याने त्यांना धन्यवाद दिले आहेत.