कोविडचा सामना करण्यासाठी सैन्यदलांना आपत्कालीन वित्तीय अधिकार

नवी दिल्ली  – करोना परिस्थितीचा सामना अधिक सक्षमपणे करता येण्यासाठी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी विशेष तरतुदींचा वापर करत सैन्यदलांना आपत्कालीन वित्तीय अधिकार प्रदान केले. या अधिकारांमुळे फॉर्मेशन कमांडर्सना विलगीकरण सुविधा, रुग्णालये सुरू करण्यास मदत होईल. तसेच विविध सामुग्रीची खरेदी अथवा दुरुस्ती करता येईल. याशिवाय, या साथीचा सामना करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या विविध सेवा आणि कार्यांसाठी पुरेशी तरतूदही करता येईल.

या अधिकारान्वये सैन्यदलांचे उपप्रमुख, चीफ ऑफ इंटिग्रेटेड डीफेन्स स्टाफच्यापासून ते कर्मचारी समिती प्रमुखांच्या अध्यक्षांपर्यंत आणि जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांच्यासह तिन्ही सैन्यदलाच्या सर्व समवर्ती अधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. तर कोअर कमांडर, एरिया कमांडर याना प्रत्येक केसमागे 50 लाखांपर्यंत, डिव्हिजन कमांडर, सब एरिया कमांडर आणि समवर्ती अधिकारी याना प्रत्येक केसमागे 20 लाखांपर्यंतचे अधिकार देण्यात आले आहेत. सुरुवातीला 1 मे ते 31 जुलै या 3 महिन्यांसाठी हे अधिकार दिले गेले आहेत. गेल्या आठवड्यात सैन्यदलांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आपत्कालीन अधिकारांव्यतिरिक्त हे अधिकार लागू राहतील.

कोविड-19 ची साथ सुरु झाल्यावर गेल्यावर्षीही सैन्यदलांना आपत्कालीन अधिकार देण्यात आले होते. परिस्थिती जलदगतीने व प्रभावीपणे हाताळण्यासाठी सैन्यदलांना याची मदत झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.