सोलापूर – अकलूज येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी बॅंकेत बॅंकेचे जनरल मॅनेजर व पाच शाखा व्यवस्थापक यांनी मिळून सुमारे 27 कोटी 6 लाख 19 हजार 814 रुपये रकमेचा अपहार केला आहे. याबाबतची फिर्याद बॅंकेच्या वैधानिक लेखापरीक्षक यांनी अकलूज पोलिसांत दिली आहे.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील बॅंकेचे वैधानिक लेखापरीक्षक गोकुळ बंकटलालजी राठी यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यामध्ये बॅंकेचे जनरल मॅनेजर नितीन बाळकृष्ण उघडे यांनी 24 कोटी 18 लाख 21 हजार 853 रुपये, टेंभुर्णी शाखेचे शाखा व्यवस्थापक रवींद्र पताळे यांनी 53 लाख 84 हजार, करमाळा शाखेचे व्यवस्थापक समीर दोशी यांनी 1 कोटी 40 लाख 84 हजार 161, सोलापूरचे शाखा व्यवस्थापक प्रदीप उघडे यांनी 53 लाख 34 हजार तसेच इंदापूर शाखेचे व्यवस्थापक सचिन सावंत यांनी 6 लाख 50 हजार तर कोथरूड पुणे शाखेचे व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे यांनी 33 लाख 45 हजार 800 रुपये असा एकूण 27 कोटी 6 लाख 19 हजार 814 रुपयांचा अपहार केला असल्याचे म्हटले आहे.
या सर्वांच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात ठेवीदारांचे वित्तीय संस्थांमधील संरक्षण या कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 3 मार्च ते 20 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.