पुणे – किरकोळ वादातून दुचाकींची तोडफोड करून दहशत माजविण्याची घटना उरळी कांचन परिसरात घडली. याप्रकरणी टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अनिल कुसाळे (वय ४४, रा. उरळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुसाळे यांच्या मुलाचा काहीजणांबरोबर किरकोळ वाद झाला होता.
दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास काहीजण कुसाळे यांच्या घराजवळ आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होती. टोळक्यातील काहीजणांनी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या दुचाकींची तोडफोड केली. परिसरात दहशत माजवून टोळके पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर तपास करत आहेत.