नवी दिल्ली – बिहार विधान परिषदेचे सदस्य असणाऱ्या ११ आमदारांचा कार्यकाळ पुढील २ महिन्यांत समाप्त होईल. त्यामुळे रिक्त होणाऱ्या त्या जागा भरण्यासाठी २१ मार्चला निवडणूक होणार आहे. संबंधित सदस्यांमध्ये मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांचाही समावेश आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीमुळे नितीश पुन्हा आमदार बनण्यास सज्ज होतील.
नितीश यांच्यासह जेडीयूच्या ४ सदस्यांचा आणि मित्रपक्ष भाजपच्या ३ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. भाजपच्या सदस्यांमध्ये संजय पासवान आणि सैद शाहनवाज हुसेन या माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.
माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यासह राजदच्या २ सदस्यांच्या जागा रिक्त होणार आहेत. तर, कॉंग्रेस आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाच्या प्रत्येकी १ सदस्याचा कार्यकाळ समाप्त होईल. निवडणूक आयोगाने रिक्त होणाऱ्या जागांसाठी शुक्रवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
त्या निवडणुकीची अधिसूचना ४ मार्चला जारी होईल. त्यानंतर ११ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येऊ शकतील. त्या निवडणुकीसाठी विधानसभेचे सदस्य मतदान करतील. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमुळे बिहारमधील राजकीय लगबग वाढेल.