Rajya Sabha – राज्यसभेवर विविध पक्षांच्या ४१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. मात्र, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या ३ राज्यांमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या १५ जागांसाठी २७ फेब्रुवारीला प्रत्यक्ष निवडणूक होईल.
देशातील १५ राज्यांमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. १२ राज्यांमधील ४१ जागांसाठी तेवढेच उमेदवार रिंगणात राहिल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि हिमाचलमध्ये जागांपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्यक्ष लढती होतील. उत्तरप्रदेशातील १० जागांसाठी ११ उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये भाजपच्या ८, तर सपच्या ३ उमेदवारांचा समावेश आहे.
कर्नाटकमधील ४ जागांसाठी ५ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. त्या राज्यात कॉंग्रेसने तिघांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजप आणि जेडीएस या मित्रपक्षांनी प्रत्येकी १ उमेदवार दिला आहे.
हिमाचलातील एकमेव जागेसाठी २ उमेदवारांमध्ये लढत होईल. त्यामध्ये कॉंग्रेस आणि भाजपच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.