पुणे -महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या दि. 4 मार्चला होणार असून, विभागीय आयुक्तांनी तसे पत्र महापालिकेला पाठवले आहे.
स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत संपल्याने, या आठ जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. आता, अध्यक्षपदासाठीही निवडणूक घ्यावी लागणार असून यासाठी विभागीय आयुक्तांनी पत्र पाठवले आहे. दि. 4 मार्चला दुपारी 01:00 वाजता अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून “पीएमपीएमएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांचे नाव देण्यात आले आहे. ही निवडणूक दि.4 होणार असली तरी या पदासाठी अर्ज मागण्याची, त्याची छाननी करण्याची आणि अर्ज माघारी घेण्याची तारीख महापालिकेने अद्याप निश्चित केलेली नाही. शक्यतो शुक्रवारी याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती प्रभारी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांनी दिली.
रासने यांना पुन्हा संधी?
जेमतेम दोन महिने अध्यक्षपदाच्या कामकाजासाठी मिळणार आहेत. स्थायी समितीचे सध्याचे अध्यक्ष हेमंत रासने आहेत. कमी कालावधी मिळणार असल्याने पुन्हा त्यांनाच संधी मिळेल की अन्य कोणाची वर्णी लागेल, हे देखील अर्ज दाखल झाल्यानंतर समजणार आहे.