नवी दिल्ली : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ यांना गुरूवारी निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेवरून ते पाऊल उचलण्यात आले. आयोगाने योगी यांच्याकडून शुक्रवारी (7 फेब्रुवारी) सायंकाळी 5 पर्यंत उत्तर मागवले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचारासाठी योगींची 1 फेब्रुवारीला सभा झाली.
त्यावेळी बोलताना योगींनी शाहीन बागेतील निदर्शकांना केजरीवाल बिर्याणी खाऊ घालत असल्याचे म्हटले. दिल्लीतील शाहीन बाग हा परिसर नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधातील निदर्शनांचे केंद्रस्थान बनला आहे. त्याचा संदर्भ देत योगी यांनी केजरीवाल यांना टीकेचे लक्ष्य केले. भाजपने प्रचारावेळी शाहीन बाग मुद्द्यावर प्रामुख्याने भर दिला.